वाट पाहताना: १

नेहमीप्रमाणे घरातून निघण्याच्या खूप अगोदर मी गॅलरीत बराच वेळ उभा राहिलो. श्रावणातल्या अल्लड सरींसारखी अधूनमधून ती तिच्या दारापाशी येउन गेली. तिचं ते क्षणात येणं क्षणात पुन्हा नाहीसं होणं मला फार सुखावून जायचं. कारण ती दाराआड होऊनही खिडकीतून माझ्याकडे पाहत असायची. मला ती अशा वेळी दिसत नसली तरी जाणवायची. ती नाहीशी होताच माझ्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव तिला टिपायला आवडत असावं बहुदा. तिचं उगाचच मग मोठ्याने हसणं, बहिणीशी मोठ्याने बोलणं... मला ऐकू जाण्यासाठी; आणि अवचित मध्येच त्या ४०-५० मीटर अंतरावरूनही धीटपणे माझ्या नजरेला नजर देणं हे सारं अनुभवणं म्हणजे माझ्यासाठी गालावरुन मोरपीस फिरल्यासारखं होतं.

"तू तिला थेट भेटून बोलत का नाही रे?" परशा मला नेहमीच हा प्रश्न विचारायचा. बरेच जण विचारायचे. खरंच! मी का नाही विचारत तिला? कितीतरी वेळा तिचं नुसतं नख तरी दिसावं, आवाज तरी ऐकू यावा, तिचं त्या घरात असणं तरी जाणवावं यासाठी मी तासनतास तिच्या दारावर डोळे ठेउन असायचो. तिला ते ठळकपणे माहिती होतं. पुढे तिला माझ्या वाट पाहण्याची जणू इतकी सवय पडली की नकळत ती देखील माझी वाट पाहू लागली. एकमेकांची वाट पाहण्यात, दुरुनच एकमेकांना पाहण्यात, हाताने खुणावण्यातच आमचे दिवस चांगले जात होते. पण ही वाट कधी पर्यंत पाहत राहणार? हा प्रश्न जो तो विचारत होताच. मलाही आणि तिलाही.

"कदाचित कुणीतरी दुसरं तिला विचारून मोकळं होईलही. तुझी वाट पाहून पाहून शेवटी ती त्याला उजवा कौल देइलही. मग तू असाच रहा. वाट बघ!" एके दिवशी परशाचे हे शब्द माझ्या वाट पाहण्यात समाधान मानणाऱ्या मनाला खोलवर चीरत गेले.

बास! आता वाट पाहण्याचे दिवस संपले. आता युद्धात उतरलेच पाहिजे. धाडस केलेच पाहिजे. थेट काय ते विचारलेच पाहिजे. आणि उत्तर ते काय असणार याचाही अंदाज आपल्याला आहेच की! होय! होय! होय! होयच म्हणणार ती! त्याअगोदर फक्त आपल्याला ती दोन वाक्ये म्हणून टाकायची आहेत.

"माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे का?"

.....

पण हे विचारायचे कुठे? ती अशी भेटणार कुठे? समोरासमोर येणार कुठे? पुन्हा प्रश्नांनी मनात नवं मोहोळ उठवलं. पण उत्तरांच्या मशाली घेउन मी ही पुढे झालो. "संध्याकाळ. क्लासला जायची वेळ. त्यावेळेस एकटीच जाते ती. बिल्डिंगपासून मागच्या रस्त्यापासून तलावाजवळच्या भक्ती स्टोअर्स पर्यंत."

अरे पण रस्त्यावर कुणीना कुणी तुम्हाला बोलताना पाहीलं तर?

"तर.. तर काय बघितलं तर बघितलं. ऐकणार तर नाहीत ना? पुढचं पुढे बघू."

पण ऐन रस्त्यात मध्येच वाट अडवून तिला थेट विचारणं बरोबर वाटतं का?

....
"नाही वाटत.... तिला दुसरीकडे बोलवावं लागेल. जिथे व्यवस्थित बसून बोलता येइल. मनातलं सारं काही सांगता येइल."

कुठे बोलवणार?

"ईस्टचं तलाव. तिच योग्य जागा. तीही लायब्ररीत जाते नाही का. तिला पुस्तक बदलण्याच्या सबबीखाली तिथे येता येइल. मस्त. ठरलं तर. तिला रस्त्यात विचारायचं. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, उद्या संध्याकाळी ईस्टच्या तलावावर येशील का?"

पण ती नाही आली तर?

"तर... तर.. पुढच्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच मिळाल्यासारखं होईल नाही का? आता हे ठरलंच. आता वाट पाहायची ती थेट ईस्टच्या तलावावर."

स्वतःच्या मनाची अशी भरपूर समजूत काढल्यानंतर मग मनाचा हिय्या करून एक दिवस आरशात तासभर उभा राहून सतरा वेळा न पडणारा भांग पाडून आणि डायलॉगची प्रॅक्टिस करून मी भक्ती स्टोअर्स पुढे जाऊन उभा राहिलो. तलावाजवळच्या वळणावरुन ती चालत येताना मला लांबून दिसली. माझ्या छातीत एकदम शाळेजवळच्या रेल्वे यार्डात उभे राहणाऱ्या कोळशावरच्या रेल्वे इंजिनासारखं धस्स्सस फस्स्स धस्स्सस फस्स्सस होऊ लागलं. ती जवळ येउ लागली. मी ही तिच्या दिशेने चालू लागलो. तिने छान फुलाफुलांचा निळा ड्रेस घातला होता. पाठिला दप्तर होतं. नेहमीची उठावदार पावलं टाकत ती नाकासमोर पाहत चालत येत होती. तिने मला पाहिलं. आमची नजरानजर झाली. माझ्या पोटात फुटबॉलएवढा गोळा तयार होऊ लागला. तिची पावलं सावध आणि संथ पडू लागली. मी ही दबकत ढकलत पुढे चालू लागलो.

मी सरळ जाऊन तिच्या पुढ्यातच उभा राहिलो. तिला हे होणार, हे अगोदरच जाणवलं असावं. ती थबकली. माझ्यातिच्यात पहिल्यांदाच इतकं कमी अंतर आलं होतं. तिची नजर खाली वळली. तिनं तसंच खाली पाहत रहावं अजिबात वर डोळे करून माझ्याकडे पाहू नये, हेच मला हवं होतं. मी दिर्घ श्वास घेउन पटकन बोलून गेलो. "मला तुला काहीतरी सांगायचेय."

"काय सांगायचेय?" तिचा आवाज इतक्या जवळून ऐकताना फार गोड वाटला मला.

"उद्या संध्याकाळी तू ईस्ट गार्डनमध्ये येशील का?" माझा आवाज मात्र हे उच्चारताना फारच घोगरा झालेला मला जाणवला. माझ्याप्रमाणे तिच्याही पोटात गोळा आला असल्याचं तिच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं.

"मी सांगते." एवढं बोलून ती कधी निघून गेली? मी कधी निघून त्याच रस्त्याने चालत घरी आलो? मला माझंच कळलं नाही. मी गॅलरीत तिची वाट पाहत राहिलो. क्लासवरुन सुटून ती घरी आली. पण आज तिने अजिबातच माझ्या दिशेने पाहिले नाही. तिचा चेहराही नेहमीप्रमाणे हसरा दिसत नव्हता. माझ्या छातीत धस्स्स झालं. त्या दिवशी ती दारात आलीच नाही. रात्रीही बराच वेळ मी तिच्यासाठी उभा होतो. मी काही चुकीचं तर वागलो नाही ना? तिला हे आवडलं नाही का? मी तिला असं विचारणं तिला आवडलं नसेल का? की या सगळ्यासाठी ती तयारच होणार नाही? पुन्हा एकदा माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं. अधीरपणे मी दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळची वाट पाहत राहिलो. तो दिवस अक्षरशः एखाद्या वर्षासारखा भासला मला. संध्याकाळी मी सर्व तयारी करून निघण्याच्या बेतात तिची वाट पाहत राहिलो. ती तिच्या दारावर आली. मी गॅलरीतून जाताना तिला मागून येण्यासाठी खुणावलं. धडधडत्या छातीने मी ईस्टच्या तलावावर पोहोचलो. हे तलाव म्हणजे त्या छोट्याशा शहरातलं माझं फार आवडीचं ठिकाण होतं. त्या तलावात खूप सारे मासे होते. तलावाच्या सभोवताली नगरपालिकेने छान सुशोभीकरण केलं होतं. तलावाच्या कडेने छान पेव्हर ब्लॉक्सची पायवाट होती. शिवाय पिंपळाची, अशोकाची अनेक झाडं तलावाच्या कडेने लावलेली होती. ठिकठिकाणी बसण्यासाठी छान बाक होते. संध्याकाळच्या वेळेत त्या तलावावर फिरण्यासाठी बरेच जण हौसेनं येत. तरीही गर्दी अशी फारशी होत नसे. संध्याकाळच्या वेळी तलावाच्या पृष्ठभागावर हळूवार लाटा तरळत. ते बघताना मन अगदी तल्लीन होऊन जाई.

तलावावर पोहोचून अगोदर मी तिथं भटकणारी माणसं निरखली. ओळखीचं कुणी तसं तिथे यायचं नाही सहसा. मी तलावाच्या कठड्याला रेलून प्रवेशद्वाराकडे टक लावून पाहत उभा राहिलो. मनामध्ये असंख्य विचार उसळी घेत होते. खरंच! किती दिवस वाट पाहत होतो आपण या दिवसाची नाही! आणि आज अखेर एखाद्या स्वप्नाप्रमाणे सगळं घडत होतं. तिला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच मनात एक वेगळीच हुरहूर तयार झाली होती. आपली एखादी फार जिवलग गोष्ट आपल्याजवळ नाही. आपल्यापासून ती फार लांब आहे. असं सतत वाटायचं. तिचं बोलणं, तिचं दिसणं, तिचं ते घायाळ नजरेने पाहणं, दिलखुलास हसणं, तिचा तो आवाज, तिच्या स्वभावातला खट्याळपणा, लाडीकपणा हे सगळं नुसतं दुरून मी एवढे दिवस अनुभवत होतो. मला ते सगळं हवंहवंसं वाटत होतं. आणि त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी होती. एका इच्छेसाठी माणसं काय काय करतात, काही काही तर एका इच्छेच्या पूर्तीसाठी आयुष्यभर वाट पाहतात. मलाही तिच्यासाठी आयुष्यभर वाट पाहायला लागली तरी माझी त्यासाठी तयारी होती. पण त्यावेळेस तिथे क्षणाक्षणाने तिची वाट पाहणं माझ्यासाठी कठीण होत होतं. मी विचारांच्या गुंगीत असतानाच मला ती समोरून चालत येताना दिसली.


माझ्याअगोदर तिनेच मला पाहिलेलं होतं. किंचित भीती, किंचित हसू, थोडीशी लाज, थोडीशी अधिरता हे सारं काही तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर दिसून येत होतं. ती थेट काही माझ्याजवळ आलीच नाही. माझ्यापासून थोडंसं दूर तलावाच्या लोखंडी कठड्याला रेलून ती खालच्या हलणाऱ्या पाण्याकडे पाहत राहिली. मी ही वळून पाण्याकडे पाहू लागलो. अधूनमधून एकमेकांकडे कटाक्ष टाकत असतानाच आमची नजरानजर झाली. सदाफुलीसारखं गोड हसू तिच्या चेहऱ्यावर होतं. आम्ही जवळ सरकत होतो. वाट पाहणं आता संपलं होतं.

नेहमीप्रमाणे घरातून निघण्याच्या खूप अगोदर मी गॅलरीत बराच वेळ उभा राहतो. श्रावणातल्या अल्लड सरींसारखी अधूनमधून ती तिच्या दारापाशी येउन जाते. तिचं ते क्षणात येणं क्षणात पुन्हा नाहीसं होणं मला फार सुखावून जातं. कारण ती दाराआड होऊनही खिडकीतून माझ्याकडे पाहत असते. मला ती अशा वेळी दिसत नसली तरी जाणवते. ती नाहीशी होताच माझ्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव तिला टिपायला आवडत असावं बहुदा. तिचं उगाचच मग मोठ्याने हसणं, बहिणीशी मोठ्याने बोलणं... मला ऐकू जाण्यासाठी; आणि अवचित मध्येच त्या ४०-५० मीटर अंतरावरूनही धीटपणे माझ्या नजरेला नजर देणं हे सारं अनुभवणं म्हणजे माझ्यासाठी गालावरुन मोरपीस फिरल्यासारखं असतं.

मग घरातून निघाल्यावर मी लायब्ररीचं पुस्तक घेउन थेट ईस्टचं तलाव गाठतो. आणि तिथे तिच्या येण्याची वाट पाहत राहतो. तुम्हाला खरं सांगू का, इथे असं उभं राहून तिची वाट पाहताना असं वाटतं की तिच्यासाठी मी आयुष्यभरही तिची अशीच वाट पाहत राहू शकेन. त्याच बाकावर. त्याच ठिकाणी.


Comments

Popular posts from this blog

वाचनालय: १

वाचनालय: २