वाचनालय: २

बाजारातून घरात येइपर्यंत माझ्याने काही धीर धरवत नव्हता. पप्पा नि मी रिक्षात बसलो. आणि मी पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केलीसुद्धा!

घराचा उंबरठा ओलांडेपर्यंत मी आफ्रिकेच्या दाट जंगलात पोहोचलोसुद्धा! आईला मी माझं गुलाबी कार्ड दाखवलं. हातातलं भलं मोठं पुस्तक सुद्धा दाखवलं.

"आता हे आणलंय तर नुसतं तेच वाचत बसू नकोस. अभ्यासाचं पुस्तक पण वाचत जा. परिक्षेत काही टारझन येणार नाही." आईने टारझनचं आमच्या घरात स्वागत केलं ते असं.

जर खरोखरीच टारझन माझ्यासोबत घरी आला असता आणि त्याने आईचे हे शब्द ऐकले असते तर तो पण बिच्चारा वाईट वाटून पुन्हा आफ्रिकेत गेला असता. आई म्हणजे पण ना आईच आहे.

टारझन पुस्तक उघडून मी थेट आफ्रिकेच्या जंगलात पोहोचत होतो. एकदम डायरेक्ट. मनगटाएवढ्या वेली पकडून सूर्याचा प्रकाशही न पोहोचणाऱ्या त्या महाभयंकर जंगलात टारझनच्या मागोमाग माझ्या उड्या पडायला लागल्या. आईसाठी तसाही मी माकड होतोच. पण आई काही टारझनच्या आईसारखी नव्हती. "टारझनची आई एक वानर असून त्याच्यावर किती प्रेम करते आणि तू साधी चहाबरोबर मला दोन खारी जास्तीची पण देत नाहीस," यावरून आमच्यात वादावादी व्हायला लागली. हळूहळू पुस्तकातून वेली बाहेर यायला लागल्या. घरातल्या भिंतीवर त्या पसरायला लागल्या. रात्री अंथरूण टाकताना उशीतून टबलट गोरीला प्रकट होऊ लागला. मी त्याची मान आवळून त्याला जमिनीवर आपटू लागलो. त्याच्या छातीवर पाय ठेवू लागलो. पुस्तकातला टारझन शाळेतसुद्धा पोहोचला. टारझनला रस्त्याने चालता येत नाही. तो झाडांवरुन उडत उडत जात असतो. मग त्याला माझी सोबत व्हायला पाहिजे म्हणून मी रस्त्याच्या कडेकडेने चालू लागलो. मी खालून चालत आणि टारझन कडेच्या झाडांवरुन उड्या टाकत. अनेक दिवस टारझन असा माझ्या अंगात संचारुन आला होता. पुस्तक वाचून संपलं. तरी पुन्हा मी ते ५ वेळा वाचलं. पुन्हापुन्हा मी जंगलातून वावरत होतो. त्यानंतर मात्र एके दिवशी लायब्ररीत पप्पांसोबत गेलो असताना मी टारझन पुस्तक ठेवून दिलं. आणि पप्पांनी पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक माझ्या हातावर ठेवलं. त्या पुस्तकाच्या कव्हरवर एक टोपी घातलेला हसरा मुलगा होता. 'बोक्या सातबंडे'.

अकबर बिरबल, इसापनीती, पंचतंत्र, हातीमताई, तीन मुले, शामची आई, किशोर मासिक... आणि असंख्य पुस्तकांतून मला नवनवीन जगात सैर करायला मिळत होती. वाचनालय म्हणजे माझ्यासाठी एक चमत्कारी गुहा होती. आणि त्यातलं पुस्तक म्हणजे एका वेगळ्याच दुनियेत आपल्याला नेणाऱ्या प्रवेशद्वारासारखं होतं. शामची आई पुस्तक माझ्या हाती आलं. ते पुस्तक जवळजवळ महिनाभर तरी घरीच राहिलं. मी आणि आईने मिळून त्या पुस्तकाची पारायणं केली होती. आणि मग गुणी शामचे दाखले घरत ऐकायला मिळू लागले.

"जा जरा हारवाल्याकडून दोन हार घेऊन ये जा, उद्यासाठी." आईचा हुकुम सुटायचा.

"मी नाही. मला खेळायला जायचंय." प्रत्येक कामाला सुरुवातीला नाही म्हणण्यात मला कसली तरी मजा यायची.

"पहिला मला हार आणून दे आणि मग कुठे भटकायला जायचंय ते जा. वाचलंस ना पुस्तकात. आईचं ऐकावं. तो शाम कसा आईला फुलं आणून देतो?"

पुस्तकातल्या शामला एका गोष्टीत शेजारच्या माधवचा जसा त्याच्या शिष्टपणाबद्दल राग येतो, तसाच राग आईचं ऐकणाऱ्या शामबद्दल मला हळूहळू येऊ लागला. ते पुस्तक माझ्या डोळ्यात आणि मनात खुपू लागलं. शामची आई शेजारच्या माधव बरोबर त्याची तुलना करते म्हणून शामला राग येतो. पण मला आई माझीच तुलना शाम बरोबर करू लागल्याने राग येऊ लागला. शेवटी ४ थ्यांदा मी ते पुस्तक वाचनालयात परत केलं. ते कधीच पुन्हा न घेण्यासाठी.

वाचनालयात बाल गटातली पुस्तके फार कमी होती. आणि जेवढी होती त्यातही सगळीच वाचण्यासारखी होती. आता पुन्हा पुन्हा तीच तीच पुस्तके हातात पडू लागली. त्यातली काही मी देखील पुन्हा पुन्हा आणून वाचू लागलो. माझी ही सवय मात्र आईला आवडणारी नव्हती. सारखं सारखं तेच तेच पुस्तक वाचायला आणल्याबद्दल ती कुरबुर करी. पप्पांची फार क्वचित पुस्तकं आईला वाचायला आवडत. आणि मुळात पप्पा ती रोज त्यांच्यासोबत पुस्तक प्रवासात वाचण्यासाठी घेऊन जात असत. त्यामुळे आईला वाचायला ती मिळतही नसत. माझ्या पुस्तकाला मात्र दोन वाचक होते. मी आणि आई. शाळेत मला पुस्तक नेता येत नसे. त्यामुळे दुपारी मी शाळेत गेल्यानंतर आईला पुस्तक वाचायला चांगलीच सवड मिळे. आईचं वाचनही तसं खूप सरावाचं होतं. पुस्तक वाचणे हा तिचा देखील आवडता छंद होता. साने गुरुजींची पुस्तकं आईला आवडत. शामची आई, तीन मुले, चित्रा नि चारू यांसारखी पुस्तके ती मला परत परत आणायला लावी. सिंदबादची सफर, हातीमताई ही पुस्तके मला तिने आणायला लावली. सुट्टीच्या दिवशी कधीतरी पुस्तक वाचण्यावरून आमच्यात भांडणं होत. तसं आमच्या दोघांच्या भांडणांना अंत नव्हता. चहा कमीच का दिला, दुधाची साय तूच का खाल्लीस, मला अंड्याची पोळी करपलेली का दिलीस, आंब्याचा बाटा तुलाच का ठेवलास, अशा छोट्या छोट्या कारणांवरून आमची जुंपत असे. याचं कारण असं की मला जे आवडायचं तेच आईला आवडायचं. किंवा तिला जे आवडायचं तीच सवय मला लागली असं म्हणायला हरकत नाही. पण भांडणात कमी बाजू घेणं आम्हाला दोघांनाही आवडायचं नाही. या भांडणांचा शेवट मग "काय रे कुत्र्या-मांजरासारखे भांडता?" या पप्पांच्या दरडावणीयुक्त प्रश्नाने होत असे.

पुस्तकावरून भांडण झाल्यास मी नेहमी माझं एक पालुपद पप्पांच्या मागे लावी. "आईला पण वेगळंं वाचनालयाचं कार्ड काढून द्या. म्हणजे ती तिला पाहिजे ते आणून वाचील." पण आईचं वेगळंं कार्ड कधी झालंच नाही. ती पुढेही नेहमी माझीच पुस्तकं वाचत राहिली.

एके दिवशी एक नवीनच पुस्तक पप्पांनी माझ्या हातावर ठेवलं. त्याच्या आतल्या पानांवर छान छान चित्र सुद्धा होती. पुस्तकाचं नाव होतं. 'शितू'.




Comments

Popular posts from this blog

वाचनालय: १

वाट पाहताना: १