वाचनालय: १

          रविवारी बाजारात पप्पांसोबत जाणं, ही लहान असताना माझ्यासाठी एक मोठी पर्वणी होती. त्याची अनेक कारणंही होती. बाजारात जातायेता आमच्या दोघांत खूप मोकळा संवाद व्हायचा. माझा स्वभाव तसा फारसा अबोल आणि मनस्वीच अधिक. वर्गातल्या बाकावर शरीर असलं तरी मन मात्र शाळेशेजारच्या तळ्याच्या काठावर किंवा अलीकडील बाजूला असलेल्या फुलांच्या बागेतील फुलपाखरांच्या पंखांवर. रस्त्याच्या कडेनं चालताना, संध्याकाळी सांजावताना उदबत्तीचा सुवास छातीत भरून घेताना, पाटीवर कधीही न पाहिलेल्या पण परिचित वाटणाऱ्या घराचं चित्र रेखाटताना मी कुठल्या तरी भलत्याच जगात हरवून जायचो. वेळ, काळ कशाचंही भान तेव्हा उरायचं नाही. आणि यामुळे अनेकदा शाळेत बाईंचा आणि घरात आईचा खरपूस मार खायला मिळत होता. त्यावेळेपासूनच एक व्यक्ती मात्र माझ्या या अशा वेडेपणातलं वेगळेपण माझ्या लक्षात आणून देत होती. पप्पा!
          रविवारच्या दिवशी पप्पांसोबत बाजारात निघाल्यावर माझ्या अनेक शंकांचे निरसन होई. शिवाय अनेक नवीन शंकाही पप्पा माझ्या मनात तेव्हाच निर्माण करत असत. मग पुन्हा आठवडाभर त्या शंकांचा गुंता माझ्या डोक्यात पडत असे. एके दिवशी पप्पा मला घेउन बाजारतल्या एका जुनाट बैठ्या घरापाशी गेले. त्या घराच्या दरवाजावर एक मोठी पाटी लावलेली होती. 'विरार सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय'. मला बाहेरच उभं करून पप्पा त्या घरात जाऊन आले. येताना त्यांच्या हातात एक फिक्कट निळसर रंगाचं छोटंसं कार्ड होतं. त्या कार्डावर त्यांना एक पुस्तक वाचायला मिळणार हे ऐकल्यावर मी विचारात पडलो. आणि कुठलं पुस्तक पप्पांना मिळणार, कसं मिळणार, कोण देणार यांसारखे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालू लागले. अर्थात त्यांची उत्तरं पप्पांनी काही लगेच दिली नाहीत. त्यासाठी पुन्हा मला ७ दिवस वाट पहावी लागली. पुढल्या रविवारी पुन्हा आम्ही बाजारात गेल्यावर बाजार करून झाल्यावर त्या 'वाचनालय' नामक इमारतीत गेलो. अनेक काचेच्या कपाटांमध्ये व्यवस्थित रचलेली बाईंडिंग केलेली ती पुस्तकं, त्यांचे कॅटलॉग आणि आपली सही घेउन पुस्तक देणारे तिथले कर्मचारी हे मी पहिल्यांदा नीटच पाहून घेतलं. अगदी पहिल्याच दिवशी वाचनालय संबंधीत दोन ठळक गोष्टी मला आवडल्या. एक म्हणजे प्रत्येक कपाटात एकदम शिस्तीत किंचीत तिरकी रचलेली शेकडो पुस्तकं आणि त्या सगळ्या पुस्तकांमधून येणारा कागदाचा जुनाटसर, हिरवट गंध! त्या जुनाट पुस्तकांना येणारा तो विलक्षण गंध मला खूपच परिचित असल्यासारखा भासला. पप्पांनी पहिल्या दिवशीच जे पुस्तक निवडलं ते बघून मी पुन्हा एकदा चांगलाच विचारात पडलो. ते पुस्तक माझ्या शाळेच्या सगळ्या विषयाच्या पुस्तकांना एकत्र केल्यावर होईल इतकं जाडजूड होतं. हे पुस्तक वाचून व्हायला पप्पांना भरपूर महिने लागतील, असंच मला तेव्हा वाटलेलं. पण पप्पांनी पुढच्याच आठवड्यात ते पुस्तक परत केलं. आणि त्याहीपेक्षा जाडजूड पुस्तक घेउन आम्ही बाजारातून घरी आलो.
          दर रविवारी बाजारातल्या वाचनालयात जाणं आता चांगलंच सवयीचं झालं होतं. तिथल्या दोन काकांशीही चांगली ओळख झाली होती. कधीकधी पप्पा पुस्तक बदलून घेण्यासाठी माझ्याकडे देत आणि स्वतः आणखी दोनचार पुस्तकं हातात घेउन चाळत बसत. मला ते आवडत होतं. कधी कधी कपाटातील एखाद्या पुस्तकावरचं छानसं चित्र बघून मी पप्पांना ती घ्यायला सुचवत होतो. चांगल्या मुखपृष्ठाची पुस्तकं वाचायला चांगली असावीत, असं मला वाटायचं; ते काही अंशी खरं असल्याचं पप्पांनीच पुढे कधीतरी सांगितलेलं. इयत्ता पाचवीला मी मोठ्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर एके दिवशी पप्पांनी माझ्या नावाचं छान गुलाबी रंगाचं कार्ड वाचनालयात बनवून घेतलं आणि मी वाचनालयाचा सभासद झालो. खूपच औत्सुक्य, आतुरता किंचीत उन्माद आणि किंचीत भीती असा तो क्षण माझ्यासाठी होता. मी तोपर्यंत पुस्तके वाचत नव्हतो असे नाही. दर महिन्याला चंपक, ठकठक आणि चांदोबा पप्पा माझ्यासाठी घेत. दिपू दी ग्रेट, विक्रम वेताळ आणि चंपकमधल्या बोलक्या प्राण्यांच्या कथा माझ्या सरावाच्या झाल्या होत्या. पण ती पुस्तकं घरात आणल्या दिवशीच मी ती वाचून संपवी. माझ्या आईच्या माझ्याबद्दलच्या ज्या १७६० करोड तक्रारी आहेत त्यापैकी एक म्हणजे मी जेवताना आणि पुस्तक वाचताना अधाशीपणा करतो. या तक्रारीवर मला कोणत्याही कोर्टात केव्हाही प्रत्यारोप करता येणार नाही. माझा हा बकासुरी बाणा लक्षात घेउन पप्पांनी मला वाचनालयाचा सभासद केलं असावं बहुदा.
          "दर वेळी पुस्तक घ्यायला आलास की माझ्याकडे पुस्तकं बघायला मागायची बरं का! तुमच्या पुस्तकांचं एकच कपाट आहे. पण ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इथे टेबलावरच आम्ही त्यातली काही पुस्तकं काढून ठेवत असतो."
          लगेचच वाचनालयातल्या काकांनी टेबलावरची साताठ पुस्तकं माझ्याकडे सरकवली.
          "कपाटात ठेवलेली पुस्तकं बघायला मिळणार नाहीत? त्यातली हवी ती निवडायला मिळणार नाहीत? मग काय टेबलावर असेल तेच घ्यायचं? शी!!"
मला हे काय बोलायला जमलं नव्हतंच पण पप्पांनी मात्र ते बरोबरच ओळखलं.
           त्यांनी त्या साताठ पुस्तकांखालून एक मोठं पुस्तक वर काढून माझ्यासमोर धरलं. त्या मोठ्ठाल्या पुस्तकावर एक मोठा माकड आणि माणसाचं फायटिंग करतानाचं चित्र होतं. आणि वर ठळक अक्षरात पुस्तकाचं नाव होतं. 'टारझन'.
क्रमशः


Comments

Popular posts from this blog

वाट पाहताना: १

वाचनालय: २